अमेरिकेने व चीनने गुरुवारी एकमेकांकडून आयात केल्या जाणाऱ्या 16 अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर जादा शुल्क आकारण्याची घोषणा केल्यामुळे व्यापार युद्धावरून निर्माण झालेल्या तणावात आणखी भर पडली आहे. अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांपर्यंत कोणत्याही वाटाघाटी करणार नसल्याचा पवित्रा चीनने घेतल्याचेही सुत्रांनी म्हटले आहे.
नव्याने शुल्क आकारण्याची तयारी
व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका व चीन या दोन्ही देशांनी आतापर्यंत एकमेकांकडून आयात होणाऱ्या 50 अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर जादा शुल्क आकारले आहे. याबाबतची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर अमेरिकेने चीनच्या आणखी 200 अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर तर चीनने अमेरिकेच्या 60 अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर जादा शुल्क आकारण्याची तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.